महाबळेश्वरच्या टोल वसुलीला रिपाईचा नमस्कार ब्रेक!
*महाबळेश्वर:* पर्यटकांकडून होणारी आर्थिक लूट आणि मनमानी शुल्क आकारणीच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आज वेण्णा लेक येथील टोलनाक्यावर जोरदार 'नमस्कार आंदोलन' केले. या आंदोलनामुळे टोलनाक्याचे कामकाज सुमारे ३ तास पूर्णपणे ठप्प झाले, परिणामी महाबळेश्वर नगरपालिकेला लाखो रुपयांचा फटका बसला.
रिपाईच्या आक्रमक भूमिकेला पर्यटक, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. आंदोलनादरम्यान रिपाई कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे हात जोडून 'नमस्कार' करत स्वागत केले आणि त्यांच्यावरील अन्यायाची माहिती दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वरात येणाऱ्या पर्यटकांकडून वाहनाच्या प्रदूषण करासह प्रत्येक प्रवाशामागे वेगळा कर आणि वनविभागाचा स्वतंत्र कर वसूल केला जातो. देशात फास्टटॅग येऊन 10-12 वर्षे झाली तरी महाबळेश्वरात ऑनलाईन पेमेंट किंवा फास्टटॅगची सुविधा नाही. त्यामुळे मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप रिपाईने केला आहे. माहिती मागूनही नगरपालिका प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही.
"पर्यटन वाढवायचे की पर्यटकांना लुटायचे?" असा सवाल उपस्थित करत रिपाईंने प्रशासनाला इशारा दिला. अन्याय थांबला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या आदेशाने सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष जॉन जोसेफ, आतिश भोसले, मिथुन तळवळकर, विनय गायकवाड, फौजीया मुलानी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment