आंबेनळी घाट अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची खा. श्री.छ. उदयनराजे यांची सांत्वन पर भेट

आंबेनळी घाट अपघातातील मृतांच्या कुटुंबियांची खा.श्री.छ. उदयनराजे यांची सांत्वनपर भेट 
26/05/2026
उमेश लांडगे सातारा
आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ 1800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदय द्रावक घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरलेली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दिनांक 26 मे 2026 रोजी मृत तरुणांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या दुर्दैवी अपघातात मर्ढे येथील उत्कर्ष शिंगटे वय 21 वर्षे,प्रवीण शिंगटे वय 25 वर्षे, आजगाव येथील महेश पवार 25 वर्षे, आदित्य साळुंखे वय 21 वर्षे,रितेश लोखंडे वय 25 वर्षे, सुहास लोखंडे वय 20वर्षे, अंश चव्हाण वय 18 वर्षे आणि खटाव येथील संदीप काटकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. एकाच वेळी आठ तरुण गमावल्याने मर्ढे, आसगाव आणि खटाव गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांच्या घरी भेट दिल्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले भावुक झाल्याचे दिसले कुटुंबीयांचे सांत्वन करताना ते म्हणाले, "मी तुमच्या मुलाची किंवा भावाची जागा भरून काढू शकत नाही, हे मला माहित आहे पण एक मुलगा आणि भाऊ या नात्याने मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन". त्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. 
या दुःखद प्रसंगी संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच गावातील एकाच कुटुंबातील तरुण गमावल्याने गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. "ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती देवो, आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो" अशी प्रार्थना उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली. दरम्यान हा अपघात कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. आंबेनळी घाटातील धोकादायक वळणांवर उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post