साताऱ्यात लोकप्रतिनिधींना शासकीय अधिकाऱ्यांना क्रांती दिनाचा विसर! सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अभिवादन
सातारा - सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. क्रांतिकारकांचा जाज्वल्य इतिहास चिरंतन ठेवण्यासाठी हजेरी माळावर ऑगस्ट क्रांती स्तंभ उभारण्यात आला आहे. ९ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र यावर्षी साताऱ्यात ऑगस्ट क्रांती स्तंभाला लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी अभिवादन करण्याचा विसर पडल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी हजेरी माळावरील ऑगस्ट क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते गेले असता मुख्य गेट कुलूपबंद होते. फोन करून पाठपुरावा केल्यानंतर सकाळी १० वाजता गेट उघडण्यात आले. स्तंभाभोवती अस्वच्छता, गवत व झुडपे दिसताच कार्यकर्त्यांनी स्वतः परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर स्तंभाला अभिवादन करून क्रांतीच्या घोषणा दिल्या. यावेळी सुशांत मोरे, भरत राऊळ, शिवाजी जाधव, गणेश अहिवळे, महारुद्र तिकुंडे, गुलाब बनसोडे, विजय जाधव, कैलास कुंभार, जयवंत कांबळे, प्रज्योत तिकुंडे, सागर जगदाळे, मोहन शिंदे व हणमंत शिंदे उपस्थित होते.
महाराष्ट्रात राजकीय नेते व सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उठता-बसता क्रांतिकारकांचे नाव घेतात. मात्र क्रांती दिनी त्याबाबत त्यांची सोयरसुतक नसल्याचे उघड झाले. चार मंत्री, डझनभर आमदार, शेकडो लोकप्रतिनिधी आणि ५० हून अधिक जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे हा दिवस निराळा ठरला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे म्हणाले, “क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात जन्माला आलेल्या प्रत्येकाने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी यायला हवे होते. मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि जिल्ह्यातील मुख्य शासकीय अधिकाऱ्यांनी या दिवशी अभिवादन केलेच पाहिजे. लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांना क्रांतिकारकांबद्दल शब्द उच्चारण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगून त्यांनी सर्वांचा जाहीर निषेध व्यक्त केला.”
महारुद्र तिकुंडे म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील राजकारणी, पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांचे क्रांतिकारकांबद्दलचे बेगडी प्रेम आज स्पष्ट झाले. हजेरी माळावर अस्वच्छता, कुलूपबंद व्यवस्था आणि फक्त नावाला असलेली समिती यामुळे ऑगस्ट क्रांती दिनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उदासीनता स्पष्ट झाली.”
शिवाजी जाधव, गणेश अहिवळे, कैलास कुंभार व जयवंत कांबळे यांनी ऑगस्ट क्रांती दिन आणि स्तंभाचे महत्त्व सांगितले. यापुढे दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment