विद्यार्थ्यांना नुकसान भरपाईची मागणी
नवी दिल्ली/मुंबई: NEET परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) चे मुख्य कमिटी चेअरमन प्रदीप कुमार जोशी व इतर अधिकाऱ्यांवर विद्यार्थी व पालकांच्या नुकसानीसाठी सदोष मनुष्यवधाचा (भारतीय न्याय संहिता कलम १०३) गुन्हा दाखल करण्याची मागणी महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.
२२,७९,७४३ विद्यार्थ्यांसाठी ५५१ शहरांतील ५४३२ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले. दिल्ली, गोवा, राजस्थान, मुंबईसह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या. मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि कुटुंबांवर पडलेला कर्जाचा बोजा यामुळे निर्माण झालेल्या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी तिकुंडे यांनी पत्र लिहिले आहे.
त्यांनी NTA चे संचालक मंडळ, चेअरमन प्रदीप कुमार जोशी, सचिव अभिषेक सिंह, विविध आयआयटी, एनआयटी, आयआयएमएस संचालकांसह सुरक्षा एजन्सी व पेपर तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संगनमत, भ्रष्टाचार, पदाचा दुरुपयोग व निष्काळजीपणाचे आरोप ठेवले आहेत. मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी तर इतर विद्यार्थी-पालकांना एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. ही भरपाई दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यासाठी त्यांची मालमत्ता गोठवावी, अशीही मागणी आहे.
तिकुंडे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री, CBI संचालक, सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह सर्व संबंधितांना ही मागणी पत्राद्वारे कळवली आहे.
Post a Comment