शिवसेना मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करा; प्रत्येक गावात शाखा उभी करा : जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव
सातारा, दि. १२ (प्रतिनिधी) - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ हा मंत्र अंगीकारून प्रत्येक गावात पक्षाची मजबूत शाखा उभी करण्याचे आवाहन करत, पक्षसंघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करावे, असा कानमंत्र शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
आगामी काळात सातारा जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करून पक्षाला मजबूत करण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात चंद्रकांत दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव, खटाव, माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
“संघटना मजबूत असेल तरच आगामी राजकीय आव्हानांना समर्थपणे सामोरे जाता येईल. त्यासाठी जिल्ह्यात शिवसेनेची संघटना अधिक सक्षम करून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच युवासेना, महिला आघाडी आणि विविध अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संघटना बांधणी, आगामी नियोजन आणि पक्षाच्या विस्ताराबाबत सविस्तर चर्चा केली. पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख रेशमाताई जगताप, युवासेना जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, समाजकल्याण सभापती संकेत साठे, उपजिल्हाप्रमुख अविनाश फरतडे, विधानसभा समन्वयक विराज खराडे, तालुकाप्रमुख पिंटू युरे, ज्ञानेश्वर पवार, बाळासाहेब मुलानी, महेश गोडसे, बाळासाहेब जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुलोचना पवार, प्रिया बर्गे, रेशमा भोसले, जिल्हा संघटक प्रिया नलवडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख (कोरेगाव) विजय जगदाळे, युवासेना संपर्कप्रमुख (कोरेगाव) तुषार घोरपडे, युवासेना शहरप्रमुख किरण जगदाळे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment