आंबेनळी घाटात भीषण अपघात ; 1800 फूट दरीत स्कॉर्पिओ कोसळली

आंबेनळी घाटात धक्कादायक अपघात : स्कॉर्पिओ १८०० फूट खोल दरीत कोसळली, आसगावचे आठ तरुण जागीच ठार
उमेश लांडगे सातारा 

सातारा/ २५ मे २०२६ : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील MH-11-DN-2340 नंबरची स्कॉर्पिओ गाडी घाटातील एका तीव्र वळणावरून अनियंत्रित होऊन सुमारे १८०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत गाडीतील सर्व आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला.मृतकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :  महेश अनिल पवार (२५)  
आदित्य अशोक साळुंखे (२१)  
ऋतेश राजेंद्र लोखंडे (२५)  
सुहास जितेंद्र लोखंडे (२०)  
अंश समीर चव्हाण (१८)  
उत्कर्ष आनंद शिंगटे (२१)  
अनिल अभिमन्यू शिंगटे (२५)  
नितीन किसन नायकोंडे (३५)

हे सर्वजण आसगावचे रहिवासी होते. ते कोकणातील हरने (दापोली) येथे फिरायला गेले होते आणि रविवारी रात्री उशिरा महाबळेश्वर मार्गे घरी परतत होते. अपघात रात्री साडेबारा ते अडीच वाजेदरम्यान घडला.स्थानिक लोक आणि रेस्क्यू टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटातील वळणावर गाडीचा वेग जास्त असावा आणि चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी खाली कोसळताच ती चुरा झाली. रात्रीचा अंधार आणि दरीची अफाट खोली पाहता बचावकार्य फार कठीण झाले. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने संपूर्ण रात्रभर प्रयत्न करत मृतदेह बाहेर काढले.आंबेनळी घाट हा नेहमीच अपघातप्रवण म्हणून ओळखला जातो. येथील तीव्र वळणे, रस्त्याची अपुरी रुंदी आणि रात्रीची कमी दृश्यमानता यामुळे असे अपघात वारंवार होतात. स्थानिकांनी सांगितले की, “रात्री या घाटातून जाणे म्हणजे जीव मुठीत धरून जाणे असते, तरीही काहीजण वेगात गाड्या घालतात.”पोलादपूर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. वेग, थकवा की रस्त्याची अवस्था यापैकी काय कारणीभूत आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.या घटनेमुळे आसगाव आणि आसपासच्या गावात शोककळा पसरली आहे. आठही तरुण गावातले चांगले आणि सक्रिय होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेनंतर दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या परिवाराला शासनाकडून मदत जाहीर करण्यात येईल असे सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post