शासकीय कामात अडथळा; शिक्षकाला बेदम मारहाण; झाली अटक


(एआय जनरेटेड इमेज)
शासकीय कामात अडथळा;शिक्षकाला
 बेदम मारहाण; झाली अटक  

लोणंद, दि. २७ :* फलटण तालुक्यातील होळ येथील प्राथमिक शिक्षक राजेंद्र दशरथ पिसाळ (वय ५२) यांना शासकीय कर्तव्य बजावत असताना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दीपक कुंडलिक धायगुडे या आरोपीस अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण फलटण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.  

प्राप्त माहितीनुसार, पिसाळ हे शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय जनगणना व दुकान गणनेचे काम करीत आहेत. दि. २४ मे रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास सुखेड (ता. खंडाळा) येथील खंडाळा रोडवर ते गणनेचे काम करीत असताना आरोपी दीपक धायगुडे याने त्यांना गाठले. कोणतेही कारण नसताना आरोपीने पिसाळ यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पिसाळ यांनी आपण शासकीय काम करीत असल्याचे नम्रपणे सांगूनही आरोपीने दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. भररस्त्यात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करून आरोपीने त्यांचे काम बंद पाडले.  

घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी राजेंद्र पिसाळ यांच्या तक्रारीवरून आरोपी दीपक धायगुडे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे व मारहाण करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास तात्काळ अटक करण्यात आली आहे.  

या प्रकरणाचा पुढील तपास लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. टेकवडे करीत आहेत. दरम्यान, फलटणच्या मातीतील एका जबाबदार व निष्ठावान शिक्षकावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा शिक्षक संघटना व सुज्ञ नागरिकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post